Top Newsराजकारण

शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत अर्धा तास चर्चा

मुंबई: पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तौक्ते वादळातील नुकसानग्रस्तांना करावयाची मदत, कोरोनाचं संकट, म्युकोर मायक्रोसिसचं संकट, लॉकडाऊनमुळे अनेक घटकांवर आलेल्या संकटासह मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. मात्र, या बैठकीतील अधिकृत तपशील स्पष्ट न झाल्याने या बैठकीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत

पवारांनी आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मधल्या काळात विविध घटकातील लोकांनी पवारांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्यांचं निवेदन या घटकांनी पवारांना दिलं होतं. त्यामुळे पवारांनी या घटकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचं सांगितलं जातं. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागाचं नुकसान झालं आहे. केंद्राकडून तोकडी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचं काय करायचं? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांकडून सल्ला घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारांचं तोंडभरून कौतुक केलं. पवारांचं नुकतच ऑपरेशन झालं. कोरोनाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतही लोकांच्या समस्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे आले. त्यामुळे पवारांना माझा सॅल्यूटच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पवार-मुख्यमंत्र्याची भेट नेमकी कशाबाबत झाली हे मला माहीत नाही. पण विकास कामांच्या मुद्द्यावर पवार नेहमी भेटतात, त्यासाठीच ही भेट असावी, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत झालेली खडाजंगी आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आलेल्या आक्षेपावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button