फडणवीस, दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे आता भाजप पक्ष याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची तक्रार
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनावरून केंद्र सरकारविरोधात अफवा पसरविल्याचा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी मलिक यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अफवा पसरविल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी भातखळकर यांनी केली आहे.