‘ब्लू टिक’पेक्षा लसीकरणाकडे लक्ष द्या; राष्ट्रवादीचा मोदी सरकारला टोला
मुंबई: ‘ब्लू टिक’वरून भाजप आणि ट्विटरमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केलेली असतानाच आता राष्ट्रवादीनेही भाजपवर निशाणा साधला आहे. ब्लू टिकपेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. ‘ब्लू टिक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्र सरकारने समजून घ्यावा, असे सांगतानाच ‘ब्लू टिक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवे, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.
ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टिक’ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहेत. ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून मोदी सरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीका त्यांनी केली आहे.