लखनौ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते जमिल अहमद शेख यांच्या हत्येचा खुलासा यूपी एसटीएफने केला आहे. एसटीएफने आरोपी शुटर इरफानला लखनौमधील कठौता तलावाजवळून अटक केली आहे. यूपी पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीचे नेते (नगरसेवक) असलेले नजीब यांच्या आदेशानुसार ही हत्या करण्यात आली असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या अटकेनंतर महाराष्ट्रात चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता आहे.
ठाणे येथे 23 नोव्हेंबर 2020 रोजी मनसे नेत्याची हत्या करण्यात आली होती. आरोपी इरफान सोनू हा गोरखपूर जिल्ह्यातील गुलरीहाच्या खीरियाचा रहिवासी आहे. शनिवारी दुपारी लखनऊमध्ये यूपी एसटीएफने त्याला अटक केली. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तांमार्फत उत्तर प्रदेश एसटीएफच्या महासंचालकांना अटकेसाठी विनंती करण्यात आली होती. मनसे नेत्याची हत्या केल्यानंतर इरफान उर्फ सोनू गोरखपूरमध्ये लपून बसला होता. आरोपी लखनौमध्ये असल्याची माहिती यूपी एसटीएफला मिळाल्यानंतर सापळा लावून एसटीएफने त्याला अटक केली. मनसे नेते जमिल शेख यांच्या हत्येसाठी आरोपीला 10 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पैकी 2 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. गोरखपूरचा रहिवासी इरफान याला लखनौ येथून अटक करण्यात आली आहे.