फोकस

एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीने आणखी दोघांना फसवले; कोणत्याही क्षणी अटक

मुंबई : रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीने साक्षीदार बनविलेल्या किरण गोसावी विरोधात पालघर जिल्ह्यातील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर निघाले आहेत.

जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. त्याच्या नवी मुंबई येथील के पी इंटरप्राईजेस या कार्यालयातून तो आपली सूत्रे हलवत होता. ह्या दोन मुलांना तिकीट आणि व्हिसा दिल्यानंतर ते विमानतळावर गेल्यावर तिकीट आणि व्हिसा बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर दोन्ही तरुणांनी केळवे पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तरुणांकडे असलेले भक्कम पुरावे पाहता आरोपी किरण गोसावी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी ह्या प्रकरणी गांभीर्य न दाखविल्याने त्या दोन्ही तरुणांचा तक्रारी अर्ज केळवे पोलीस ठाण्यात धूळ खात पडून होता.

आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनविल्यानंतर एका वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या बातम्या दरम्यान आर्यन खानसोबत सेल्फी घेत असलेला किरण गोसावी ह्याला उत्कर्ष तरे यांनी पाहिल्यावर आपली फसवणूक केलेली व्यक्ती हीच आहे, याची खात्री त्याला पटली आणि दोन्ही तरुणांनी तात्काळ केळवे पोलीस स्टेशन गाठून आपली फसवणूक करणाऱ्या गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, अनेक गुन्हे दाखल असलेल्या गोसावीला एनसीबीने साक्षीदार बनविल्याच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ह्यांनी आक्षेप घेतल्याने एनसीबीचे अधिकारी अडचणीत सापडले होते. त्यातच ह्या प्रकरणात गृह विभागाकडून पालघर पोलिसांवर दबाव वाढत चालल्याने अखेर केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. केळवे पोलीस गोसावी च्या मागावर असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे पोलिसांनी सांगितले.

आरोपी किरण गोसावीचे बालपण पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये गेले असून तो एक प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थी म्हणून त्या भागात परिचित होता. मनोर मधील लालबहादूर हायस्कूल शाळेमधून त्याने नववी पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्या शाळेत समोरच तो राहत होता. प्रामाणिक आणि एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित असलेला गोसावी मुंबई, ठाणे येथे गेल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात येऊन त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button