Top Newsफोकस

आलिशान जहाजावर ड्रग्स पार्टी; एनसीबीच्या छाप्यात १० जणांना अटक

रेव्ह पार्टीत बॉलीवूडमधील सुपरस्टारचा मुलगा

मुंबई : एनसीबीच्या एका पथकाने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान जहाजा (क्रूझ) मध्ये ड्रग्स पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एनसीबीचे काही अधिकारी प्रवासी बनून जहाजामध्ये गेले. त्यानंतर गेल्या सात तासांपासून ही कारवाई सुरू आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कार्डेलिया या जहाजावर ग्रीन गेटजवळ ही कारवाई करण्यात आली. या रेव्ह पार्टीत बॉलीवूडशी संबंधित काहीजण उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई झाली आहे. ते आपल्या टीमसह मुंबईमध्ये संबंधित जहाजामध्ये दाखल झाले होते. दरम्यान, हे जहाज समुद्रात पोहोचल्यावर तिथे ड्रग्स पार्टीला सुरुवात झाली. या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्सचे सेवन होत होते. त्याचवेळी एनसीबीच्या टीमने कारवाई सुरू केली. एनसीबीचे पथक प्रवासी बनून गेल्याने या कारवाईची कुणकुण कुणालाही लागली नाही. तसेच सर्व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात मदत झाली.

कॉर्डेलिया या २००० प्रवासी क्षमतेच्या जहाजावर २ व ३ ऑक्टोबरसाठी मुंबई-गोवा-मुंबई ट्रीपचे आयोजन करण्यात आले होते. या क्रूझवर उच्चभ्रू वर्गीयांचा प्रामुख्याने समावेश होता. त्यांच्यात ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला मिळाली. शनिवारी रात्री गोव्याला जाऊन ते सोमवारी सकाळी परत मुंबईला येणार होते. त्यासाठी आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविले होते. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

क्रुझवर पार्टीला सुरुवात झाल्यानंतर एनसीबीने मुंबई पोलिसांना माहिती देत अतिरिक्त कुमक मागवून घेतली. गोव्याला जाणारी क्रुझ बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. क्रुझ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्याठिकाणी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर एनसीबीने रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेतले. या सर्वांची बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात रात्रभर चौकशी करण्यात आली. या सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, एनसीबीने या कारवाईवेळी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेतले. त्याशिवाय १० अन्य आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबीकडून पहिल्यांदाच जहाजावरील ड्रग्स पार्टीचा भांडाफोड करण्यात आल्याने ही कारवाई अधिक मोठी मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या जहाजाचे हल्लीच अनावरण झाले होते. तसेच त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपली कला सादर केली होती.

रेव्ह पार्टीत बॉलीवूडमधील सुपरस्टारचा मुलगा

या रेव्ह पार्टीत बॉलीवूडमधील सुपरस्टारचा मुलगाही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, ही माहिती खरी असल्यास मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीसाठी ड्रग्ज कसे आणि कुठून आणले, याविषयी संबंधितांना विचारणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button