एनसीबीच्या अधिकाऱ्याला विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणी अटक
मुंबई : उदगीर -लातूर रोड दरम्यान एका विद्यार्थिनीची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार हैदराबाद -हडपसर रेल्वे गाडीमध्ये गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी विद्यार्थिनीने एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. छेडछाड करणारा व्यक्ती हा एनसीबीचा (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) मुंबई येथील अधिकारी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. एनसीबीचा अधीक्षक असलेल्या दिनेश अंकुश चव्हाण या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी येथील जीआरपी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची आला आहे. या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री हैदराबाद- हडपसर या रेल्वेने एनसीबीचा एक अधिकारी व एक विद्यार्थिनी प्रवास करीत असताना त्या अधिकाऱ्याने विद्यार्थिनीची छेड काढली. त्यानुसार विद्यार्थिनीने रेल्वे पोलिसाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून आरोपीस परळी रेल्वेच्या जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार लातूर रोड दरम्यान घडला आहे. आज अटक करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.