फोकस

जिल्हा प्रशासनाचा नाशिककरांना सतर्कतेचा इशारा; गोदावरीला पूर

नाशिक: गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असून त्या विसर्गात वाढ करुन १५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होऊन मोठा पूर येऊ शकतो. नदीकाठलगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी

नाशिकमधील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणं भरल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. नाशिक शहरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. रामसेतू ब्रिजपर्यंत पाणी वाढलं आहे. त्यामुळे सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली आहे. दुकानं हटवण्याची धावपळ सुरू आहे. तर प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जायकवाडीचे तब्बल १८ दरवाजे उघडले, मराठवाड्यात पूरस्थिती

जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाटयाने वाढ होत आहे. धरणाचा जलसाठा ९५ टक्के झाल्याने गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जायकवाडीचे सध्या १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने दरवाजे उघडण्यात येत आहेत. १० हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन करण्यात येत आहे.

पूर्वानुभव पाठीशी धरुन गोदाकाठच्या गावात राहणा-या सर्व नागरिकांनी शेतामध्ये असणारा शेतीमाल, शेतीऔजारे तसेच पाळीव प्राणी, जनावरे यांना सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे. घरामध्ये राहणारे वयोवृध्द, लहान मुलं, महिला या सर्वांना सुरक्षित ठिकाणीच ठेवणे आवश्यक आहे. कोणाच्याही मालाची अथवा जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. नांदगाव, दिंडोरीसह आसपासच्या भागास मुसळधार पावसाने झोडपले. नांदगावमधील काही भागांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. जिल्ह्यातील साकुरी गावची गाव नदी पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. कांदा, बाजरी, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तीनदा झालेल्या अति पर्जन्यवृष्टीमुळे नदीला आलेला पूर, झालेले नुकसान, यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. गतवर्षी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान अजून मिळालेले नाही, नुसता पंचनामा केला जातो, परंतु शासनाकडून भरपाई मिळत नसल्याची तक्रार आहे.

दरम्यान, २८ तारखेलाही नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात २९६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा येवला तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर तुलनेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये तुरळक पाऊस होता. मंगळवारी पहाटेपासून नाशिक, दिंडोरी, नांदगाव व आसपासच्या भागात पावसाने जोर पकडला. नांदगावला अतिवृष्टीचा तडाखा बसला. पुरामुळे काही भागांशी संपर्क खंडित झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button