Top Newsराजकारण

एनसीबी झाली, आता ईडीची बारी; नवाब मलिकांचा इशारा

पुणे : माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा दावा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच ‘एनसीबी झाली, आता ईडीची बारी’, असं म्हणत मलिकांनी भाजप नेत्यांना इशारा दिला.

एनसीबी झाली, आता ईडीची बारी आहे. मी आता ईडीचा पर्दाफाश करणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही. तो योग्यवेळी नक्कीच फोडेन. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा दावा नवाब केला.

विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवारांनी त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जावं, ही भूमिका त्यावेळी सर्वप्रथम मी पक्ष बैठकीत मांडली होती. पवारांनी ती उचलून धरताच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे. ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर मार्गाने नाहीतर राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं मी त्यावेळीच शरद पवारांना सांगितलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही खोट्या आरोपात गोवण्यात आलं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक यांना ईडीची भीती दाखवून हे मविआ सरकार पाडण्याचा डाव होता. पण आम्ही तो हाणून पाडला”, असा दावा नवाब मलिकांनी केला. तसेच “हा माझा व्यक्तिगत लढा नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातला लढा आहे. म्हणूनच मी एनसीबीच्या बोगस केसेस उघड केल्या. मनातली भीती काढून टाकून भाजपविरोधात लढा. नक्कीच यश येईल, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

इतके दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपचं ओझं खांद्यावर वाहत होते. बहुतेक त्यांना ऑपरेशन करुन घ्यावे लागले. बरं झालं त्यांनी वेळीच हे भाजपचं ओझं खांद्यावरुन उतरवलं. देश पातळीवर शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधतील. काळजी नसावी. जो डर गया वो मर गया. एवढंच सांगतो. मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत नवाब मलिकांनी निशाणा साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button