Top Newsराजकारण

ईडी कार्यालयातून नवाब मलिकांचा भाजपवर हल्लबोल; ट्विटरवर म्हणाले, ‘ना डरेंगे, ना झुकेंगे’

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; काँग्रेससह शिवसेनेचा मालिकांना पाठिंबा

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तर ईडीकडून चौकशी सुरू असतानाच नबाव मलिक यांनी एक सूचक ट्विट केले आहे. ‘ना डरेंगे, ना झुकेंगे, Be ready for 2024! असे नवाब मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आज पहाटे नवाब मलिक यांच्या निवास्थानी आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू असतानाच मलिक यांनी या ट्विटमधून केंद्र सरकार आणि भाजपला इशारा दिल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या आदेशाने केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांना आपण घाबरणार नाही, तसेच अशा कारवायांसमोर झुकणार नाही, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण तयार आहोत, असा बोध मलिक यांच्या या ट्विटमधून होत आहे.

या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, याबाबत काय बोलायचं? यात काही नवीन नाही. सध्या ज्या प्रकारे यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे त्याचं हे एक उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कधीतरी घडेल. नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.

काँग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी : नाना पटोले

नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून, आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही. कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपचा हा नवा धंदा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पाहत आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी, विनाकारण मारी धाडीवर धाडी; अमोल कोल्हेंचा मालिकांना हटके पाठिंबा

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी खास कवितेच्या माध्यमातून नवाब मलिक यांना पाठिंबा दर्शवला. कोल्हे यांनी ट्विटरवर एक कविता शेअर करून नवाब मलिकांना पाठिंबा दर्शवला आहे.

सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?

पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी

असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले आहे.

…म्हणूनच मलिकांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार – जयंत पाटील

 

ईडीने स्वतःचे पोलीस आणून कोणीतही माहिती न देता घेऊन जाणे म्हणजे सर्व गोष्टींची पायमल्ली आहे. अलीकडच्या काळात नवाब मलिक यांनी काही प्रकरणे बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून कदाचित नवाब मलिक यांना अडचणीत आणण्याचा प्रकार आहे. कोणते प्रकरण आहे याची माहिती नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा प्रकार सुरु आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला.

नवाब मलिक यांनी दाऊद व्यवहार आरोपांबद्दल उत्तर दिले आहेत. यंत्रणाचा गैरवापर होतो, अति गैरवापर सुरु आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले आहे, असे जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘जनाब संजय राऊत, ही तर भारतमातेसोबत गद्दारी’ मलिकांबाबतच्या भूमिकेवरून नितेश राणेंचा टोला

नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. तसेच सत्य बोलताहेत त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जात आहे, असा दावा केला होता. मात्र आता त्यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. नितेश राणे म्हणाले की, जनाब संजय राऊत आमच्या मुंबईत १९९३ मध्ये झालेली साखळी बॉम्बस्फोटांची मालिका आपण सत्तेसाठी मुजरा करण्याच्या नादात विसरलेले दिसताहेत. या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये दाऊद इब्राहीम सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते. अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानत आहात. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button