ईडीच्या समन्समध्ये नवाब मलिक ‘महसूल मंत्री’ !

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणताही समन्स न बजावताच ईडीने घरातून नेले. तसेच समन्सवर सही करण्यासाठी सांगण्यात आले होते. पण समन्सवर सही न करण्याचा पवित्रा नवाब मलिकांनी घेतल्यानंतर त्यांना रिमांड कॉपीच्या आधारावर अटक करण्यात आली. या रिमांड कॉपीमध्ये नवाब मलिक यांचा उल्लेख महसूल मंत्री असा आहे. नेमकी हीच चूक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खानने प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे. आव्हाड यांनी केलेल्या खुलाशानुसार नवाब मलिक हे कधीच महसूल मंत्री नसल्याचा दावा केला आहे.
नवाब मलिक हे पाचवेळी मंत्री होते. त्यांच्या मंत्रीपदाची माहिती घेतली, केव्हा ते तंत्रशिक्षण मंत्री होते, कधी अल्पसंख्यांक मंत्री होते, गृहनिर्माण विभागाचे राज्यमंत्री होते. पण या राजकीय कारकिर्दीत ते कधीच महसूल मंत्री नव्हते. पण या रिमांड अर्जात कोणाचे तरी स्टेटमेंट घेतले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, की चुका करत जा. ही जमीन २००३ आणि २००५ मध्ये घेतली. या संपूर्ण प्रकरणात आधी सलीम पटेलचे नाव आले. आता ईडीचे अधिकारी सलीम फ्रुटचे नाव घेत आहेत. मुस्लिम व्यक्तींमध्ये लाखो सलीम नागपाड्यातच सापडतील.
१० रूपयांच्या रावळगावच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल !
या संपूर्ण व्यवहारात ईडीचा संबंध येतो कुठे असाही सवाल आव्हाड यांनी विचारला आहे. अवघ्या ५५ लाखांवर ईडी लागणार असेल, तर दहा रूपयांच्या रावळगावच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल, याचीही ईडी चौकशी होऊ शकते म्हणून. एकंदरीतच हा ईडीमार्फत त्रास देण्याचा प्रयत्न आहे. केवळ नवाब मलिक केंद्राला एक्स्पोज करताहेत म्हणून हा त्रास दिला जात आहे. त्यामधून केंद्रीय तपास यंत्रणा ही मुलाबाळांचे शाप ईडी घेत आहे.
जमीन आम्ही खरेदी केली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण या प्रकरणात अतिशय वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट दाखवण्यात येत आहे. अनेक गोष्टी तोडमोड करून हा व्यवहार दाखवण्यात आल्याचा आरोप निलोफर मलिक यांनी केला.