विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमतापेक्षा जास्त मताने जिंकू; राज्यपालांना मलिकांचा टोला
मुंबई : आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल. मात्र, आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केलाय. माध्यमांशी बोलताना मलिक यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं होतं. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचं एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. त्यावरुन मलिक यांनी राज्यपालांना टोला लगावलाय. विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सुचवलं आहे. निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणं आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरु असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असं सूचित केलं आहे. मात्र विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर १२ आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असं सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह मलिक यांनी राज्यपालांना केलाय.