राजकारण

नवज्योत सिंग सिद्धू अद्याप आपल्या राजीनाम्यावर ठाम

चंदीगड: एकीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असली, तरी दुसरीकडे काँग्रेस मात्र अंतर्गत वाद मिटवण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेण्याबाबत नवज्योत सिंग सिद्धू ठाम आहेत. मध्यंतरी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी सिद्धू यांना समजवण्याचे प्रयत्न केले, तरी सिद्धू मात्र नियुक्त्या रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसत आहेत. यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्विट करत जर तसे झाले नाही, तर आम्ही कोणाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही, असे म्हटले आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला होता. तसेच कॅबिनेटमध्ये ज्यापद्धतीने पोर्टफोलियोचे वाटप झाले त्यावर सिद्धू समाधानी नव्हते. नव्या कॅबिनेटमध्ये सुखविंदर सिंग रंधावा यांना गृहमंत्री बनवण्यात आले, मात्र सिद्धू आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा याला विरोध होता. यातच आता एक ट्विट करत पुन्हा एकदा नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

धार्मिक ग्रंथांची झालेली बदनामी प्रकरणी न्यायाची मागणी आणि अंमली पदार्थांच्या व्यापारामागील मुख्य दोषींना शिक्षा करण्यासाठी सन २०१७ मध्ये आपले सरकार स्थापन झाले. मात्र, या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे याआधीच्या मुख्यमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. यावर आता एजी/डीजी नेमणुका या पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी झाल्यात असे वाटते. जर या नियुक्त्या रद्द झाल्या नाहीत किंवा त्या मागे घेतल्या गेल्या नाहीत, तर आम्ही कोणाला तोंड दाखवण्यालायक राहणार नाही, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या तत्त्वांचे कायम पालन करेन. तसेच मी पक्षात कोणत्याही पदावर असो अथवा नसो, मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत उभा राहीन. सर्व नकारात्मक शक्तींना मला पराभूत करण्याचा जेवढा प्रयत्न करायचा आहे, तेवढा करू द्या. परंतु सकारात्मक ऊर्जेच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाने पंजाब जिंकेल. पंजाबियत (युनिव्हर्सल ब्रदरहुड) जिंकेल आणि प्रत्येक पंजाबी जिंकेल!!, असेही नवज्योत सिंग सिद्धू यांनी याआधी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button