अर्थ-उद्योग

लॉकडाऊनमध्ये माथाडी कामगारांना अडवल्यामुळे नरेंद्र पाटील संतप्त; बाजार समिती चालू न देण्याचा इशारा

नवी मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास मानाई करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानं सुरु ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच नियमानुसार माथाडी कामगारांना अडवल्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील संतप्त झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारकडून कोणत्याही माथाडी कामगाराला अडवण्यात येऊ नये, अन्यथा एपीएमसी मार्केट चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

नवी मुंबई सानपाडा रेल्वे स्थानकामधील माथाडी कामगार तसेच मापाडी तोलणार यांना अडवण्याचा प्रकार घडला. या कामगारांना रेल्वे स्थानकावर टीसी यांनी अडवले. यावेळी कामगारांना सोडण्याची विनंती केली असता महाराष्ट्र सरकारकडून माथाडी कामगार तसेच बाजार समितीशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मुभा असल्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत असे उत्तर देण्यात आले. या प्रकारामुळे नरेंद्र पाटील यांनी आक्रमक होत या प्रकाराचा विरोध केला. तसेच जर माथाडी कामगार आणि मापाडी कामगारांना अडवण्यात येऊ नये. त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. यानंतर जर माथाडी कामगारांना अडवले तर उद्यापासून (२३ एप्रिल) एपीएमसी मार्केट चालू देणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला. पाटील यांनी फेसबुक लाईव्ह करत वरील मागणी केली आहे.

नरेंद्र पाटील यांनी २२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी माथाडी कामगार, मापाडी तोलणार आणि बाजार समितीच्या सर्व कामांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, अशी विनंती केली होती. तसेच सरकारने त्याबाबतीत आदेश जारी करावेत असेसुद्धा नरेंद्र पाटील यांनी म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button