राजकारण

दगडं घालून मंत्र्याच्या गाड्यांच्या काचा फोडल्या पाहिजेत, मराठा आरक्षणावरुन नरेंद्र पाटील आक्रमक

सोलापूर : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज सोलापुरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. सोलापुरात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी बोलताना घरात बसून, काळे झेंडे दाखवून आंदोलन करायचं नाही. हे असे मिळमिळीत आंदोलन मराठ्यांचं नाही. एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून काचा फोडल्या पाहिजेत, असं वक्तव्य नरेंद्र पाटील यांनी केलंय. तसंच सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांवरही त्यांनी जोरदार टीका केलीय.

ओबीसी समाजाचे नेते त्यांचं राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीतील आरक्षण अडचणीत आल्यावर एकत्र येतात. मग राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील मराठा नेते गुटखा खावून बसलेत का? असा खोचक सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारलाय. या मंत्र्यांना लाज वाटत नाही का? तसं असेल तर मग आम्ही मराठा नाही असं तरी जाहीर करा, अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधलाय. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलीय.

नरेंद्र पाटील यांनी बीडमधील मराठा मोर्चानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. अजित पवार तुम्हीही उपमुख्यमंत्री आहात, आपण व्यक्तिशः माझे दादा आहात. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही शांत का? रायगडावर निघणाऱ्या मावळ्यांवर गुन्हा दाखल केले जात आहेत त्यांच्या गाड्या अडवल्या जातात हे कितपत योग्य आहे ? ओबीसी आणि इतर समाजाचे नेते त्यांच्या समाजावर अन्याय होत असल्यास एकत्र येतात, मग आपले मंत्री काहीच का बोलत नाहीत, असा सवाल नरेंद्र पाटील यांनी विचारला होता.

सोलापूरमध्ये आयोजित बैठकीत या बैठकीत माजी मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुखही सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या तरुणांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र लिहावं असं आवाहन आमदार देशमुख यांनी केलंय. त्याचबरोबर मोर्चासाठी कोणतंही राजकारण करु नये, सर्वांनी मराठा समाजाच्या पाठिशी उभं राहावं. ५८ मोर्चे निघाले त्यावेळी जी सर्वांची भूमिका होती तीच आताही असावी, असं आवाहनही देशमुख यांनी या बैठकीत केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button