राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो !
नारायण राणेंचा संजय राऊतांना इशारा

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका राणे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. काँग्रेस आता कुठे आहे का? ती संपत चालली आहे. राहुल गांधींना आता कुणाचा तरी आधार पाहिजे. जेव्हा जेव्हा राहुल गांधी कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात, तेव्हा तेव्हा तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास आहे, असं राणे म्हणाले.
सव्वा महिना झाला. राज्य सरकारचे वाभाडे काढले नाही. त्यामुळे मी १६ तारखेनंतर महाराष्ट्रात येणार आहे. राज्य अधोगतीकडे चाललंय. त्यामुळे लोकांना जागृत करणार आहे, असं सांगतानाच परत चिपळूणला जाणार असून पूरग्रस्तांशी चर्चा करणार आहे. मी गेल्या गेल्या केंद्र सरकारने ७०० कोटी रुपये दिले आहेत. राज्य सरकारने केवळ दहा हजार रुपये दिले. लोकांनी ते पिंपात टाकले. आता ते फुगून बाहेर येतील, अशी टीका त्यांनी केली.




