लालूंच्या पक्षात भाऊबंदकी; तेज प्रताप यांची राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी

हाजीपूर : राष्ट्रीय जनता दल मध्येही सर्व काही ठीक नाही. पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. दरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी तेज प्रताप यादव आरजेडीमध्ये नसल्याचा दावा केला आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे निवडणूक चिन्ह कंदील वापरण्याची परवानगी नाही, असा दावाही शिवानंद तिवारी केला.
पक्षामध्ये तेजस्वी आणि तेज प्रताप यांच्यातील गदारोळाच्या प्रश्नावर शिवानंद तिवारी यांनी धक्कादायक खुलासा केला. दोन भावांमधील वादाच्या प्रश्नावर शिवानंद तिवारी म्हणाले की, तेज प्रताप यादव यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच, तेज प्रताप यादव यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह कंदील वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे, म्हणजेच लालू यादव यांच्यानंतर राजदमधील पक्षाचा वारसा पूर्णपणे तेजस्वी यांना देण्यात आला आहे, असेही शिवानंद तिवारी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, आरजेडी पक्षाचे उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणाले की, तेजप्रताप पक्षात कुठे आहेत? त्यांनी एक नवीन संघटनाही स्थापन केली आहे. ते आरजेडीमध्ये नाहीत. त्यामुळे हकालपट्टी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांची आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेत कंदील चिन्ह लावले होते, त्यामुळे पक्षाने त्यांना सांगितले की, कंदील लावता येणार नाही. याबाबत त्यांनी स्वतः कबूल केले की, आपल्याला नकार देण्यात आला आहे. हा संदेश स्पष्ट आहे.
दरम्यान, बिहारमधील पोटनिवडणुकीसंदर्भात महाआघाडीमधील दरी वाढत असल्याचे दिसते. आरजेडीने दोन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याच्या घोषणेवर काँग्रेस नाराज आहे, त्यामुळे आता आरजेडी एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेसला डिवचताना दिसत आहे. हाजीपूरला पोहोचलेल्या शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसला टोला हाणला आणि म्हटले की, विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या, पण काय झाले?
आरजेडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी म्हटले की, काँग्रेसच्या जिद्दीमुळे उत्तर प्रदेशात भाजपा जिंकला आणि अखिलेश यादव पराभूत झाले. जर काँग्रेसला बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालसारख्या राज्यात ड्रायव्हिंग सीट हव्या असतील, तर आरजेडीसारखे प्रादेशिक पक्ष कुठे जातील, असे सवालही शिवानंद तिवारी यांनी केला.
दरम्यान, अशा परिस्थितीत, आरजेडी पोटनिवडणुकीत कोणत्याही किंमतीत काँग्रेससाठी जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर, आरजेडीने येत्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला आपल्या समीकरणांनुसार त्यांच्या भूमिकेत बसवण्याचे ठरविले आहे.