मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. इडीची कारवाई म्हणजे केंद्र सरकारच्या सुडाचं राजकारण आहे. अनिल परब यांनाही अशीच नोटीस देण्यात आली. हे ठरवून केलं जातंय. यंत्रणांचा दुरूपयोग होतोय, असा दावा विनायक राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकहिताची कामं करत आहेत, रणनीती आखण्याची गरज नाही. शिवसेनेला वाडीपर्यंत वाढवू, काही जरी झालं तरी कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. जनआशिर्वाद यात्रेबद्दल विश्लेषण केलंय, ७५ गाड्या मुंबईतून नेल्या. स्थानिकांचा प्रतिसाद नव्हता, असं राऊत म्हणाले. राणेंच्या या नौटंकीनंतर कोकणात राणेयुक्त राडेबाज विकृती फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.
चंद्रकांत पाटलांसारख्या माणसाने असं वक्तव्य करता कामा नये. केंद्राच्या सूचनेला हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतोय, याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करत, राऊत यांनी भाजपच्या मंदिरांबाबतच्या आंदोलनावर टीका केली.
नाणार प्रकल्प होणार नाही, हे प्रकरण बंद झालं आहे ते परत उकरणार नाही, पण बाजूला रिफायनरी व्हावी, यासाठी पाच गावातील ७० टक्के लोकांचा विरोध आहे, तर ३० टक्के लोकांचं समर्थन आहे, त्यांचे अर्ज घेऊन मी मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे. त्यावर ते निर्णय घेतील, असं विनायक राऊत यांनी सांगितलं.