Top Newsराजकारण

नाना पटोलेंचा ‘त्या’ मोदीबाबतचा दावा खोटा!; भाजप नेते आणखी आक्रमक

भंडारा/मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. नानांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झालेल्या भाजपने आज दिवसभर राज्यभरात आंदोलन करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नाही तर एका स्थानिक गावगुंडाबाबत बोललो होतो, तसेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे, असा दावा पटोले यांनी सकाळी केला होता. मात्र पटोलेंचा हा दावा आता खोटा ठरण्याची शक्यता आहे. आम्ही मोदी नावाच्या कुठल्याही व्यक्तीला अटक केलेली नाही, असे पोलिसांनी सांगितल्याने या प्रकरणात पटोलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नाना पटोलेंनी केलेले विधान आणि नंतर केलेल्या दाव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आपण दावा केलेल्या मोदी नावाच्या गावगुंडाला पोलिसांनी अटक केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले होते. मात्र नानांचा दावा पोलिसांनी खोडून काढला आहे. पोलीस अधिकारी अरुण वाईकर यांनी सांगितले की, या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या चौकशीतून जो समोर येईल, त्यावरून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, नाना पटोले यांनी केलेल्या दाव्याबाबत गावातील लोकांना विचारणा केली असता, त्यांनी मोदी नावाचा कुठलाही गुंड गावात नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाना पटोलेंचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का?; भाजपचा काँग्रेसला थेट सवाल

आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही पटोलेंसह काँग्रेस आणि राहुल गांधींना काही रोखठोक सवाल केले. नाना पटोलेंच्या वक्तव्यावर काँग्रेस नेतृत्व गप्प का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कटात राहुल गांधीची मूक संमती आहे का? भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यात घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही. पंजाबमध्ये फसलेला कट महाराष्ट्रात शिजतोय का? याचा तपास केंद्रीय एजन्सी मार्फत करावा, असे काही प्रश्न विचारत चित्रा वाघ यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे, असा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केला. ‘नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी’, असं खुलं आव्हानदेखील माधव भांडारी यांनी दिलं. “स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष वापरत नाहीत, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतात, ही वस्तुस्थिती भयावह आहे”, अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली.

पटोलेंवर टीका करताना भाजपच्या महिला महापौरांची जीभ घसरली

राज्यभरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी नावाच्या व्यक्ती बद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. ढोरे यांनी पटोले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली आहे. ढोरे नाना पटोलेंवर टीका करताना म्हणाल्या, पटोले यांना डांबरी रस्त्यावर आणून तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू. यावेळी, महापौरांसोबत भाजपच्या इतर कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या फलकावरील फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

महापौर ढोरे पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबद्दल अशी भाषा पटोले करत असतील तर समोर त्यांनी समोर यावं, आम्ही महिलाच बास झालोत. त्याला डांबरी रस्त्यावर तुडवून काढू, त्याला त्याची जागा दाखवू,” असा एकेरी उल्लेख करत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच यावेळी महापौर माई ढोरे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले हे भाष्य निंदनीय आहे.

नाना पटोले यांना एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणं शोभत नाही. त्यांना मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीची किंमत कळत नसेल तर ते काँग्रेसचे अध्यक्ष राहण्याच्या लायकीचे नाहीत. काँग्रेस पक्ष पटोलेंसारख्या नालायक लोकांना अध्यक्ष करून माणसांच्या अंगावर कुत्र्यासारखे सोडत असतील, तर ते अशोभनीय आहे, असंही ढोरे म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button