संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नदीम-श्रवण या जोडीने अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. या जोडीने विशेषतः नव्वदीचा काळ गाजवला. मात्र, गुरुवारी या जोडीतील श्रवण यांचे निधन झाले. त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. याबाबत त्यांचा मुलगा संजीव राठोडने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली. ‘माझ्या वडिलांचे आज निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण त्याला ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला,’ असे संजीवने सांगितले.
श्रवण यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना माहिमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते. श्रवण यांना कोरोनाबरोबरच इतर अनेक आजार असल्याने त्यांची प्रकृती नाजूक होती. श्रवण यांच्यावर डॉ. किर्ती भूषण हे उपचार करत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवण हे व्हेंटिलेटवर होते. त्यातच त्यांना मधुमेहाचा त्रास असून करोनाचीही लागण झाली आहे. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले आहे. त्यातच आता हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण झाल्या आहेत. त्यांचे हृदयही योग्य पद्धतीने काम करत नव्हते. यासंबंधीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते.
बॉलिवूडमध्ये १९९० च्या दशकात नदीम- श्रवण या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘आशिकी’नंतर, ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते. ‘श्रवणच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नदीम यांनी दिली आहे.