सुबोध जयस्वाल यांना फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स
मुंबई : सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई सायबर पोलिसांनी एसआयडीचा गोपनीय अहवाल फुटी प्रकरण आणि फोन टॅपिंग प्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. त्यामुळे सीबीआय विरुद्ध राज्य आणि मुंबई पोलीस असा डाव रंगल्याची चर्चा सुरु झाली आहे. जयस्वाल यांना १४ ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील सीबीआयने समन्स बजावले होते. मात्र ते सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.
दरमहा शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तीन महिन्यांपासून कोणत्याही चौकशीला हजर न राहिल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे या दोघांना समन्स बजाविले होते. देशमुख यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठीची दोघांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे, अशी सीबीआयची भूमिका आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसूली प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील या प्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्याच तपासाचा एक भाग म्हणून आता सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतर आता फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावले आहे.