Top Newsराजकारण

राणेंच्या अटकेनंतर भाजपवाल्यांना मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते !

राणे आता औट घटकेचे मंत्री; 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा हल्लाबोल

मुंबई : राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? राणेंच्या अटकेनंतर भाजपवाल्यांना इतक्या मिरच्या झोंबण्याचे कारण नव्हते. भाजपमधील फौजदारी वकिलांनी राणे यांच्या धमकीवजा वक्तव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटलांकडून ती अपेक्षा नाही, असे स्पष्ट करतानाच ‘सामना’च्या आजच्या अग्रलेखात सगळ्यात स्फोटक आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे राणेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळावर भाष्य करण्यात आलंय. राणे मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत, याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी, असं म्हणत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी स्वतःला महान समजणे बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, असा टोला लगावत राणेंच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली असेल तर ती मोदीच काढणार हे नक्की, असा इशाराही आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणे यांना दिला आहे. यामध्ये शिवसेनेने फडणवीस-चंदक्रांतदादांकडून काही अपेक्षा ठेवल्यात तर राणेंना इशाराही दिला आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य ही गांजाचे सेवन करुन केलेली वक्तव्य असल्याचा टोला लगावत ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे!’ असा सल्ला देण्यात आला आहे. इतकच नाही तर भाजपची नशा लवकरात लवकर उतरो हीच ‘अटल’चरणी प्रार्थना’, असं म्हणत राणेंच्या वक्तव्यावरुन भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते. मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे.

”राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचे वक्तव्य केले ते आम्हाला मान्य नाही, पण राणेंवरील कारवाई योग्य नाही,” हे विधान फडणवीस वगैरे लोक करतात ते कोणत्या आधारावर? अबलेवर एखाद्याने अत्याचार केला, पण त्याच्या मनात तशी काही विकृत भावना नव्हतीच हो, तेव्हा आरोपीला निर्दोष सोडा व पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळीक द्या, अशाच प्रकारचा हा युक्तिवाद आहे. काही काळ वकिली (फौजदारी) करणाऱ्या फडणवीसांकडून ही अपेक्षा नाही. राणे यांना पोलिसांनी पकडल्यावर राज्यात अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट असल्याचे म्हणणे हा राज्याचा अपमान आहे. फडणवीस व इतरांना राणे हे काय खान अब्दुल गफार खान वाटले काय? कायद्याने चाललेले राज्य मोडण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न आहेत, पण त्यांचे प्रयत्न चिरकूट पद्धतीचे आहेत. हे राज्य जितके आजच्या सत्ताधारी पक्षाचे आहे तेवढेच ते विरोधी पक्षांचेही आहे. तेव्हा राणे यांच्या अटकेनंतर भाजपवाल्यांना इतक्या मिरच्या झेंबण्याचे कारण नव्हते. भाजपमधील फौजदारी वकिलांनी राणे यांच्या धमकीवजा वक्तव्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटलांकडून ती अपेक्षा नाही.

राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपवाले नसलेले ‘बाटगे’ भाजपनिष्ठेची जोरात बांग देऊ लागल्यावर ते घडले हे समजून घेतले पाहिजे. राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवऱ्या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत.

राज्यात इकडे तिकडे थोडे काही झाले की, विरोधी पक्षाची कुंडलिनी जागी होते व राज्यात कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातो. यापुढे महाराष्ट्रात विरोधकांकडून हे असले प्रश्न विचारले जाणार नाहीत. भारतीय जनता पक्षाचे ‘पर’आत्मा नारायण राणे यांच्यावर कायद्यानेच कारवाई झाली व माणूस ‘नॉर्मल’ असो वा राणेंसारखा ‘अ‍ॅबनॉर्मल,’ कायदा सगळ्यांसाठी सारखाच हे राज्याच्या पोलिसांनी दाखवून दिले. राणे यांची अटकही इतर सामान्य गुन्ह्याप्रमाणे आहे, असं म्हणत राणेंच्या अटकेसाठी मंत्र्यांनी दबाव टाकल्याच्या आरोपांना राऊतांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं.

राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते, असं म्हणत या राड्याला सर्वस्वी राणे आणि भाजपमधील लोकांना राऊतांनी जबाबदार धरलं आहे. तसंच शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते, असंही सांगायला राऊत विसरले नाही. राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं आणि अटक केली असं त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भरसंसारातून कायमचं कुणी उठवलं याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा, अशी मागणी करुन राणेंसमोरच्या अडचणी वाढण्याचे संकेतच जणू राऊतांनी दिलेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button