मुंबई : दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असणाऱ्याची शक्यता तपाय यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यासोबत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे.
दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संध्याकाळी पोलीस दल आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक देखील बोलावली आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती. याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली आहे. एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचं तिकीट काढून देणाऱ्यालाही एटीएसनं ताब्यात घेतलं आहे.
दिल्ली पोलिसांनी पकलेल्या दहशतवाद्यांकडून दिल्लीसह मेट्रो शहरात बॉम्बस्फोट करण्यात येणार होते. ओसामाव जीशन बॉम्ब बनविण्याची तयारी करत होते. या दोघांनी दोन आयईईडीही बनवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आधी दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशातील कोटामधून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. या सहापैकी एक जण महाराष्ट्रातील असल्याचे समजते. सणासुदीच्या काळात आणि निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यावर काहींच्या हत्या व विशिष्ट ठिकाणी स्फोट करण्याचा यांचा कट होता, असे पोलिसांनी सांगितले.
पाकिस्तानात १५ दिवसांचे प्रशिक्षण
झीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते.
अटक केलेला एक दहशतवादी मुंबईचा टॅक्सीचालक
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील धारावी-सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. त्याच्या घरी कुटुंबियांची एटीएस तसेच गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. शेख हा सायन येथील सोशननगरमधील केलाबखार परिसरातील खोली क्रमांक १८५ मध्ये दोन मुली आणि पत्नीसोबत येथे राहतो. त्याच्या एका मुलीचे पदव्युत्तर शिक्षण झाले असून, दुसरी मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे.