
अबुधाबी : आयपीएलच्या १४ व्या पर्वातील ४२ वा सामना मंगळवारी अबुधाबीच्या शेख झायद मैदानात खेळवला गेला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जवर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघानी उत्तम खेळ दाखवला. आधी मुंबईने १३५ धावांमध्ये पंजाबला रोखले. पण त्यानंतर पंजाबनेही मुंबईसारख्या तगड्या फलंदाजी असलेल्या संघाला १३६ धावांचे आव्हान सहजासहजी पूर्ण करु दिले नाही. मुंबई संघाकडून खेळणारा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्या या सामन्यात पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळाले. ३० चेंडूत धमाकेदार ४० धावांची खेळी करत पंड्याने मुंबईला सामना १ ओव्हर आणि ६ गडी राखून जिंकवून दिला.
सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं पंजाब किंग्सविरुद्ध मुसंडी मारली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली. हार्दिक पांड्यानं आजही गोलंदाजी न केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या तंदुरूस्तीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, तुफान फटकेबाजी करून त्यानं टीकाकारांना उत्तर दिले. सौरभ तिवारीच्या दमदार खेळीनंतर हार्दिकचं वादळ घोंगावलं अन् पंजाब किंग्सचा पालापाचोळा करून गेलं. मुंबई इंडियन्सनं सांघिक कामगिरी करताना विजय मिळवून प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
मनदीप सिंग ग व लोकेश राहुल यांना बॅटीशी योग्य संपर्कच होत नव्हता. सहाव्या षटकात कृणाल पांड्यानं पंजाबला पहिला धक्का दिला. मनदीप १५ धावांवर पायचीत झाला. किरॉन पोलार्ड यानं ७व्या षटकात पंजाबला दोन धक्के दिले. गेल १ व लोकेश २१ धावांवर माघारी परतला. किरॉन पोलार्डनं एकाच षटकात ख्रिस गेल व लोकेश राहुल या दोन मोठ्या फलंदाजांना बाद करून इतिहास रचला. निकोलस पूरनचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. जसप्रीत बुमराहनं त्याला २ धावांवर पायचीत केलं. एडन मार्कराम व दीपक हुडा यांनी ४ बाद ४८ असा गडगडलेला पंजाबचा डाव सावरला.मार्करामनं २९ चेंडूंत ६ चौकारांसह ४२ धावा केल्या. हुडाही २८ धावा करून माघारी परतला. बुमराहनं २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. पोलार्डनं १ षटकांत ८ धावांत २ विकेट घेतल्या. पंजाब किंग्सला ६ बाद १३५ धावाच करता आल्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचीही सुरुवात काही खास झाली नाही. पंजाब किंग्सचा मागील सामन्यातील स्टार गोलंदाज रवी बिश्नोई यानं आजही कमाल केली. त्यानं पहिल्याच षटकात रोहित शर्मा ( ८) व सूर्यकुमार यादव ( ०) यांची विकेट घेतली. सूर्या गुगलीवर त्रिफळाचीत झाला. बिश्नोईच्या गोलंदाजीवर झेल सोडणे पंजाब किंग्सला महागात पडताना दिसत होते. पण, मोहम्मद शमीनं पंजाबला तिसरा धक्का देताना क्विंटन डी कॉकचा ( २७) अडथळा दूर केला. १२व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सौरभनं फटका मारला तो अर्षदीपच्या हातात पुन्हा गेला. सौरभनं क्रिज सोडल्याचे अर्षदीपला वाटले, पण तो थांब थांब म्हणत असतानाही त्यानं चेंडू फेकला. तो त्याच्या अवघड ठिकाणी लागला व वेदनेनं कळवला.
पण, प्राथमिक उपचार घेऊन तो पंजाबला भिडला. त्यानं ३७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलवले आहे. हार्दिक पांड्यावर आता सर्व भीस्त होती आणि तो त्याला खरा उतरला. किरॉन पोलार्ड होताच त्याच्यासोबत, मग मुंबई इंडियन्सला विजय मिळवण्यात फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. पांड्यानं काही अतरंगी फटके मारून चाहत्यांना थक्क केले. पांड्यानं खणखणीत षटकारानं मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईनं ६ विकेट्स व ६ चेंडू राखून हा सामना जिंकला. हार्दिकनं ३० चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांनी नाबाद ४० धावा केल्या. पोलार्ड ७ चेंडूंत १५ धावांवर नाबाद राहिला.