राजकारण

मुंबईतील ‘बत्ती गुल’मागे चीनचा हात, ऊर्जामंत्र्यांचा खुलासा

मुंबई : मुंबईत ऑक्टोबरमध्ये सर्वत्र वीज गेली होती. यामागे चीनचा हात असल्याचं समोर आलं आहे. चीनकडून सायबर हल्ला करण्यात आला होता. याबाबतची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. यासंदर्भातील सायबर सेलचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख हे नितीन राऊत यांच्याकडे सोपवणार आहेत. ज्यावेळी मुंबई अंधारामध्ये गेली होती तेव्हा मी सूतोवाच केला होता की काही तरी घातपात केला आहे, आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की, हा घातपात करण्यात आला आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

१२ ऑक्टोबर २०२० ला मुंबईत अचानक वीज गेल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. अनेकांची गैरसोय झाली. दक्षिण मुंबई सारख्या विभागात वीज गेल्याने अनेक महत्त्वाच्या कार्यालयात कामांची अडचण निर्माण झाली होती. तसंच हॉस्पिटलची महत्वाची कामं रखडली होती. वीज वितरित करणार्‍या कंपनीच्या ग्रीडमध्ये काही समस्या निर्माण झाल्या कारणाने वीज गेले असल्याचे स्पष्टीकरण त्या वेळी वीज मंडळ तसेच वीज वितरण कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र ही वीज काही तांत्रिक अडचणीमुळे गेली नव्हती तर चीनने सायबर हल्ला केल्याची माहिती आता समोर येत आहे. हा हल्ला करण्यामागे काय कारण होते याचा उलगडा गृहमंत्री अनिल देशमुख करणार आहेत.

मुंबईतील वीज जेव्हा गेली तेव्हा मी यासंबंधी शंका व्यक्त केली होती. तेव्हा मला वेड्यात काढले. या घटनेत काही तरी संशयास्पद आहे. पण त्या वेळी अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की तो सायबर हल्ला झालेला आहे. त्या संबंधाचे रिपोर्ट सायबर विभागाकडे देण्यात आले आहेत, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button