Top Newsअर्थ-उद्योगराजकारण

मुंबै बँकेवर प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनेलला २१ पैकी २१ जागा

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (मुंबै बँक) च्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. मुंबै बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. यातील १७ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या.

चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या ४ जागांची मतमोजणी आज पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदारसंघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मतं तर सुखदेव चौगुले यांना १६ मतं मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मतं, तर कमलाकर नाईक यांना ५९ मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदारसंघात जयश्री पांचाळ यांना ३३२ मतं तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मतं मिळाली आहेत. याशिवाय, भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदारसंघातून अनिल गजरे यांना तब्बल ४ हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना अवघी ३५० मते मिळाली.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंबै बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनील राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. मुंबै बँक निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

दरेकर मजूर वादाने निवडणूक गाजली

दरम्यान, या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर वर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे वाद झाला होता. त्याला विरोधी गटाने आक्षेप घेतला होता. दरेकर मजूर कसे असू शकतात, मजुराची व्याख्या काय असे सवाल या निमित्ताने करण्यात आले होते.

पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास : प्रवीण दरेकर

या विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबै जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. अनेकांनी मुंबै जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीकाटिप्पणी केली होती. मात्र, मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच, नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले असल्याचे दरेकर यांनी म्हटले.

विरोधकांनी नारळ फोडण्याचे काम केले – प्रसाद लाड

बडोबाना थंड करण्याचे काम आज जिल्हा बँकेच्या निकालानंतर पहायला मिळाले. कुठलाही पक्ष न ठेवता निवडणुक लढण्याचा निर्णय झाल्यानंतरही ज्या चार जणांनी निवडणूक लढण्याचा निर्णय केला तरी देखील २०१९ ची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळाले. २१ उमेदवार आम्ही निवडून आणले आणि विरोधकांचा नारळ फोडण्याचे काम आम्ही केले, अशी प्रतिक्रिया सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.

आजचे विजयी उमेदवार

मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघ – विठ्ठल भोसले (राष्ट्रवादी), प्राथमिक ग्राहक मतदारसंघ – पुरुषोत्तम दळवी (काँग्रेस), महिला सहकारी संस्था मतदारसंघ – जयश्री पांचाळ (राष्ट्रवादी), भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघ – अनिल गजरे (भाजप)

बिनविरोध १७ उमेदवार : नागरी सहकारी बँक – संदीप सीताराम घनदाट, पगारदार सहकारी संस्था – आ. प्रसाद मिनेश लाड, नागरी सहकारी पतसंस्था – शिवाजीराव विष्णू नलावडे, गृहनिर्माण संस्था – आ. सुनील राजाराम राऊत, अभिषेक विनोद घोसाळकर, मजूर सहकारी संस्था – आ. प्रवीण यशवंत दरेकर, आनंदराव बाळकृष्ण गोळे, औद्योगिक सहकारी संस्था – सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे, विष्णू गजाभाऊ घुमरे, इतर सहकारी संस्था – नंदकुमार मानसिंग काटकर, जिजाबा सीताराम पवार, व्यक्तिगत (वैयक्तिक) – सोनदेव बाळाजी पाटील, महिला राखीव मतदार संघ – शिल्पा अतुल सरपोतदार, कविता प्रकाश देशमुख, अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ – विनोद दामू बोरसे, इतर मागासवर्गीय मतदार संघ – नितीन धोंडीराम बनकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button