Top Newsफोकस

कफ परेड, मंत्रालय, नरिमन पॉईंटसह बराचसा भाग २०५० पर्यंत पाण्याखाली जाणार !

महापालिका आयुक्तांचा भयावह इशारा

मुंबई : वातावरण बदलाचा परिणाम येत्या काळात मुंबईतही जाणवणार असं अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं. आता मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही इशारा दिला की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण मुंबईचा बराचसा परिसर २०५० पर्यंत पाण्याखाली जाईल. यामध्ये मुंबईची शान असलेला नरिमन पाँईट, मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया यासारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश आहे.

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई हवामान बदल नियोजनाबाबतच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात इकबाल सिंह चहल बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटलं की दक्षिण मुंबईतल्या ए, बी, सी आणि डी वॉर्डाचा ७० टक्के भाग हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांमुळे पाण्याखाली जाईल. निसर्ग इशारा देत आहे पण नागरिकांना काही जाग येत नाहीये. मात्र हीच स्थिती काय राहिली तर परिस्थिती गंभीर होईल. कफ परेड, नरिमन पॉईंट, मंत्रालय यासह ८० टक्के परिसर पाण्याखाली जाईल, म्हणजे गायबच होईल. २०५० म्हणजे २५-३० वर्षे फार लांब नाहीत, असं मुंबई महापालिका आयुक्तांनी म्हटलं.

मुंबई किनारपट्टीवर ‘निसर्ग’ सारखं चक्रीवादळ १२९ वर्षांत पहिल्यांदा धडकलं. त्यानंतर मात्र गेल्या १५ महिन्यांत तीन चक्रीवादळं मुंबई किनारपट्टीवर आली. ५ ऑगस्ट २०२० रोजी नरिमन पॉईंटजवळ पाच-साडेपाच फूटांपर्यंत पाणी साचलं होतं. त्यामुळे निसर्गाकडून संकेत मिळत आहेत, ते आपण ओळखून योग्य पावलं उचलली पाहिजेत. तसं न झाल्यास त्याचे परिणाम पुढच्या पिढीला नाही, तर आताच्या पिढीलाही भोगावे लागतील. हवामानबदलासाठी स्वतःचं नियोजन तयार करून त्यावर काम करणारं मुंबई हे दक्षिण आशियातलं पहिलं शहर आहे,’ असंही चहल यांनी स्पष्ट केलं.

दोन महिन्यांपूर्वी मुंबईला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. मुंबईत ६ आणि ७ जूनदरम्यान मान्सून दाखल होतो. मात्र या वादळामुळे १७ मे रोजीच २१४ मिमी पाऊसाची नोंद झाली. ९ जूनपूर्वी, मुंबईत जूनच्या ८४ टक्के पावसाची नोंद झाली आणि जुलैमध्ये, महिन्याच्या सरासरीच्या ७० टक्के पाऊस फक्त चार दिवसांत १७ ते २० जुलै दरम्यान झाला, ही स्थिती भयानक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button