मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापताना पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साबणे यांचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुभाष साबणे यांच्यावर टीका करत, रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही, या शब्दांत खडे बोल सुनावले आहेत.
रावसाहेब अंतापुरकर यांच्या आकस्मिक निधनानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या जागेसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी नसताना युतीचे उमेदवार म्हणून साबणे यांनी शिवसेनेकडून या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता. शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला नाही. आपल्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसताच साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत साबणे यांनी भाजमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, ते शेतकऱ्यांचे दुख: समजू घ्यायला गेले होते की, नांदेडला जाऊन शिवसेनेचे माजी आमदारांना पक्षात घ्यायला गेले होते हे लोकांना कळले आहे. गेली अनेक वर्ष ते काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घेत होते. भाजपकडे स्वतःचे काही नाही. निवडणूक लढण्यासाठी त्यांनी आमचा माणूस घेतला आणि तोही रडका, असा खोचक टोला लगावत शिवसैनिक हा परिस्थितीच्या विरुद्ध रडत नाही, तर लढतो. रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही. पण भाजपाने हे काही नवीन धोरण सुरू केले आहे. स्वतःचे काही नसल्यामुळे दुसऱ्यांची लोक घ्यायचे. हे फार काळ चालत नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक फडणवीसांचा ‘मुखवटा’ होता…
विरोधी पक्ष हे बौद्धिक बेइमानी करीत असून राजकीय फसवेगिरीतही ते आघाडीवर असल्याचे ज्वलंत मत मोदी यांनी नुकतेच मांडले. विरोधकांनी लोकांना फसवू नये व गोंधळ निर्माण करू नये, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. त्याबरहुकूम राज्यातल्या विरोधी पक्षाने वागायचे ठरवले असेल तर त्यात त्यांचे व राज्याचेही हित आहे. अर्थात तसे होईल का, हा प्रश्नच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
मराठवाड्यातील पूरस्थितीविषयी एक संयमी भूमिका मांडणाऱया फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच. म्हणजे पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का? फडणवीस यांचा पूरग्रस्त भागाचा दौराही अखेर ‘व्हाया ओला दुष्काळ’ राजकारण, असाच झाला म्हणायचा, असं म्हणत शिवसेनेने फडणवीस यांच्यावर टीका केली. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्या दौऱ्यावर टीका केली.
महाराष्ट्राच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधी कोकणात महाप्रलय, दरडी कोसळणे यांसारखे प्रकार झाले. पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातील जळगाव वगैरे भाग पाण्याखाली गेला. आता विदर्भ-मराठवाडय़ातील पूरपरिस्थितीने शेतकरी नामोहरम झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर मराठवाडा, विदर्भातील पूरग्रस्त भागात गेले. त्यांनी शेतकऱयांची गाऱहाणी ऐकली. अशा प्रकारे विरोधी पक्षाने त्यांचे कर्तव्य बजावले आहे. फडणवीस हे पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे राज्याचे शेतीविषयक प्रश्न व आर्थिक घडी याविषयी त्यांना चांगलीच माहिती आहे. पूर, दुष्काळ, अपघातप्रसंगी विरोधी पक्ष असे दौरे करतो, तेव्हा त्यात राजकीय भागच जास्त असतो.
संकटग्रस्त अशा प्रसंगी अश्रूंना बांध मोकळा करून देतात व विरोधक त्याच अश्रूंचे भांडवल करून सरकारला धारेवर धरण्याची संधी घेतात. अर्थात फडणवीस यांच्याविषयी आम्हाला असे काहीच म्हणायचे नाही. विरोधी पक्षनेत्यांनी परिस्थितीचा ‘आँखों देखा हाल’ पाहिला व आता त्यांनी याबाबत त्यांना जे वाटते ते सरकारला सांगायला हवे. शेतीचे नुकसान झाले आहेच. शेतात, घरात पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार माजला. हा एक प्रकारे ओला दुष्काळ आहे व या सर्व शेतकऱयांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी श्री. फडणवीस यांनी केली ती योग्यच आहे. महाराष्ट्रातील पुराच्या विळख्यात सापडलेला शेतकरी हा राजकारणाचा विषय नाही.
संजय राऊत कागदावरचे नेते; फडणवीसांची जोरदार टीका
फडणवीसांच्या या दौऱ्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. त्यावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हे कागदावरचे नेते असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. ऑफिसच्या एसीत बसून हे मोठे लीडर झाले आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय कळणार? अशा शब्दांत फडणवीसांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस आज लातूरच्या दौऱ्यावर आहेत. लातूरातील पूरपरिस्थीतीची ते पाहणी करत आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचं दु:ख काय माहित? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असं फडणवीस म्हणाले.