कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; भाजप कार्यकर्त्याला अटक
कल्याण-डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात बलात्कार, विनयभंगाच्या घटना वांरवार समोर येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली एका भाजप कार्यकर्त्याला अटक केली आहे. पप्पू सहानी असं आरोपीचं नाव आहे. पण आरोपीने असं काही केलं नसल्याचा दावा केला आहे. आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असं आरोपी पप्पू सहानी याने म्हटलं आहे.
संबंधित घटना ही कल्याणच्या टिळक नगर पोलीस ठाणे हद्दीत रात्री दहाच्या सुमारास घडली. पीडित अल्पवयीन मुलगी लहान मुलांची शिकवणी घेते. आरोपीची मुलगीदेखील पीडितेकडे शिकवणीसाठी येत होती. या दरम्यान पीडिता रविवारी संध्याकाळी आरोपीच्या मुलीला घरी सोडण्यासाठी गेली. पण पप्पू सहानी या नराधमाने तिला रस्त्यातच गाठलं. त्याने अंधाराचा फायदा घेत पीडितेचा विनयभंग केला. पीडितेने जीवाचा आटापीटा करत आरोपीकडून सुटका करुन घेतली.
संबंधित घटनेनंतर पीडिता टिळक नगर पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांकडे आरोपीची तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी पप्पू सहानीला बेड्या ठोकल्या. पप्पू हा मुलुंडमध्ये भाजपचं काम करतो. तो सध्या कल्याणमध्ये राहतो. दरम्यान या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले आहे.