Top Newsस्पोर्ट्स

मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेला १९७ धावांवर रोखले; भारताची स्थिती मजबूत

सेन्चुरिअन : पहिल्या दिवशी फलंदाजांचे आणि दुसऱ्या दिवशी पावसाचे वर्चस्व असलेल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात भारतीय संघाने १ बाद १६ धावांची मजल मारली. त्याआधी भारताचा पहिला डाव ३२७ धावांवर तर दक्षिण आफ्रिकेचा संघ १९७ धावांवर आटोपला. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाकडे १४६ धावांची आघाडी असून राहुल नाबाद ५ तर नाईट वॉचमन शार्दूल ठाकूर नाबाद ४ धावांवर खेळत आहे. मयंक अग्रवाल मात्र ४ धावांवर बाद झाला. संपूर्ण दिवसात एकूण १८ गडी बाद झाले. आफ्रिकेच्या लुंगी एन्गीडीने ६ तर भारताच्या मोहम्मद शमीने ५ बळी टिपले.

भारतीय फलंदाजांची घसरगुंडी

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या भारताने पहिला दिवस उत्तम खेळला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने ३ गड्यांच्या मोबदल्यात २७२ धावा केल्या. पण तीच लय तिसऱ्या दिवशी त्यांना कायम ठेवता आली नाही. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड तासात भारताने ५५ धावांत उर्वरित सात गडी गमावले. लोकेश राहुलने १२३ धावांची तर मयंक अग्रवालने ६० धावांची खेळी केली. टीकेचं लक्ष्य ठरत असलेल्या अजिंक्य रहाणेनेही ४८ धावा केल्या. आफ्रिकेकडून लुंगी एन्गीडीने सहा बळी टिपले. रबाडाने तीन तर जेन्सनने एकमेव बळी घेत त्याला चांगली साथ दिली.

दक्षिण आफ्रिकन फलंदाजांची शरणागती

भारताच्या घसरगुंडीनंतर आफ्रिकन फलंदाजांचीही काहीशी तशीच अवस्था झाली. पहिल्या षटकात कर्णधाराची विकेट गमावलेल्या आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात आणखी चार बळी गमावले. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या दोघांनी काही काळ झुंज दिली. पण दुसऱ्या सत्रात डी कॉक ३४ धावांंत माघारी परतला. टी टाईमनंतर खेळण्यास उतरलेल्या बावुमाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं पण नंतर ५२ धावांवर तो देखील माघारी परतला. रबाडाने उपयुक्त २५ धावा केल्या पण इतर सारेच फलंदाज झटपट बाद झाले.

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने दमदार कामगिरी करून दाखवली. त्याने भेदक मारा करत ४४ धावांत पाच बळी टिपले. जसप्रीत बुमराहने १६ धावांत दोन तर शार्दूलने ५१ धावांत दोन गडी बाद केले. सिराजच्या नावावर केवळ एकच बळीची नोंद झाली.

ऋषभ पंतने मोडला धोनीचा विक्रम

भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. पण दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या डाव त्यापेक्षाही झटपट गडगडला. या डावात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याने विशेष कामगिरी तर केलीच, पण त्यासोबतच त्याने महेंद्रसिंग धोनीचा विक्रमही मोडीत काढला. धोनीचा वारसदार म्हणून सध्या ऋषभ पंतकडे पाहिलं जातं. पंतदेखील आपला खेळ दिवसेंदिवस चांगला करत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तशातच, पंतकडे आजच्या सामन्यात आपला आदर्श असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रम मोडला. भारतीय संघाकडून यष्टीरक्षण करताना सर्वात जलद १०० गडी बाद करण्याचा बहुमान ऋषभ पंतने मिळवला. धोनीने आतापर्यंत सर्वात जलद ३६ सामन्यात बळींचं शतक पूर्ण केलं होतं. पण पंतने अवघ्या २६व्या कसोटीतच ही कामगिरी केली.

ऋषभ पंतच्या नावे मालिका सुरू होण्याआधी यष्टीरक्षक म्हणून ९७ बळी होते. आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्याने आणखी चार झेल टिपत कसोटीतील आपलं बळींचं शतक पूर्ण केलं. आता पंतच्या नावे यष्टीरक्षक म्हणून १०१ गडी आहेत. त्यापैकी ९३ झेल आहेत तर ८ स्टंपिंग आहेत. आफ्रिकेच्या पहिल्या डावात पंतने कर्णधार एल्गर आणि टेंबा बावुमा यांचे झेल घेतले. त्याने विआन वुल्डरचा झेल टिपत त्याने शतक पूर्ण केलं. आणि अखेरीस रबाडाचे झेल घेत १०१वा बळी मिळवला.

आफ्रिकेविरूद्धचा पहिला सामना हा पंतचा २६वा कसोटी सामना होता. महेंद्रसिंग धोनीने ३६व्या कसोटी सामन्यात ही किमया केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून यष्टीरक्षक म्हणून सर्वात जलद बळींचे शतक पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत पंत आणि धोनीनंतर वृद्धिमान साहा तिसरा (३७), किरण मोरे चौथे (३९), नयन मोंगिया पाचवे (४१) आणि सय्यद किरमाणी सहाव्या स्थानी (४२) आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button