मोदी सरकारचा कोरोना विरोधातील लढा चुकीचा; सल्लागार समितीतील विषाणू शास्त्रज्ञाचा राजीनामा
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूनं अक्षरशः थैमान घातलं आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर दिवसाला चार हजाराहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होतं आहे. कोरोना विषाणूच्या धोक्याची किंवा दुसऱ्या लाटेची पूर्वकल्पना केंद्र सरकारला देण्यात आली होती. पण सरकारची कोरोना साथ हाताळण्याची पद्धतचं चुकीची असल्याचा आरोप करत प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार शास्त्रज्ञांच्या फोरममधून राजीनामा दिला आहे.
संबंधित फोरम कोरोना विषाणूच्या विविध व्हेरिएंट्सचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली होती. या फोरममध्ये देशातील प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला होता. कोरोना साथीच्या लढ्यात केंद्र सरकारच्या नियोजनावर आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर जमील मागील काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत होते. पण सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्यानं विषाणू शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी सल्लागार समितीतून राजीनामा दिला आहे.
वैज्ञानिकांची ही फोरम जैव प्रौद्योगिक विभागाच्या अंतर्गत येते. या मंत्रालयाच्या सचिव रेणू स्वरूप यांनी अजूनतरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांनुसार, या फोरमनं केंद्राला अगोदरच पूर्वकल्पना दिली होती की, मार्च महिन्यात कोरोना विषाणूची नवीन लाट येईल. यामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढेल. परिणामी कोरोना संसर्गाचा वेग वाढून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येईल. पण केंद्र सरकारनं सल्लागारांच्या संकेतांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गाफिल राहिलेल्या देशाला मार्चपासून कोरोना विषाणूचा तीव्र फटका बसला आहे.