Top Newsराजकारण

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी काय केले? फडणवीसांकडून मोदी सरकारची वकिली

मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या अनेक भागात नागरिक संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने महाराष्ट्राच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. केंद्र सरकारच्याही संपर्कात आहे. चिपळूणमध्ये लष्कराची तुकडी सुद्धा मदतकार्यात आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला, तेव्हा केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त चमू महाराष्ट्रात पाठविल्या आहेत. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या आप्तांना २ लाख रूपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे.

चिपळूण येथे लष्कराची तुकडी दाखल होऊन मदतकार्य करीत आहे. एनडीआरएफच्या २६ चमू, भारतीय हवाईदलाचे एक सी-१७, दोन सी-१३० तसेच एक एमआय-१७ हेलिकॉप्टर मदतकार्यात तैनात करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या सर्वाधिक ४ चमू रत्नागिरीत, कोल्हापुरात ३, मुंबई, रायगड, ठाण्यात प्रत्येकी २, तर सातारा, नागपूर, पालघर, सांगली आणि पुण्यात प्रत्येकी १ चमू तैनात आहे. कोलकाता आणि बडोदा येथून प्रत्येक ४ चमू येत आहेत. एनडीआरएफच्या वतीने तळिये या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले जात आहे, अशी माहिती नित्यानंद राय यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button