मोदी सरकारने ‘कोविन-अॅप’चे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे : जयंत पाटील
मुंबई : कोविन-अॅपमधील तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भारत सरकारने लसीकरण अॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
कोविन-अॅप मध्ये अनेक तांत्रिक त्रुटी येत आहेत. लॉगिन व ‘OTP’साठी विलंब अशा अनेक तक्रारी येत आहेत. एका मध्यवर्ती अॅपवरून जवळपास १.३ अब्ज भारतीयांची वेळेवर नोंदणी होणे, हे अत्यंत आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत महत्त्वपूर्ण अशा लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत असेही जयंत पाटील यांनी नमूद केले आहे.
The sheer number of complaints of CoWin platform – technical lags, login issues and OTP delays – reflects serious logistical concerns. It is indeed a challenge to timely register 1.3 billion Indians on one central platform. (1/3) https://t.co/ToF19mVMC2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 10, 2021
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक राज्याला स्वतंत्र अॅप तयार करून द्यावे किंवा महाराष्ट्र सरकारला स्वतःची अॅप निर्माण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली होती. केंद्र सरकारने यावर तात्काळ विचार करावा असेही जयंत पाटील म्हणाले.
राज्याचे स्वतंत्र अॅप विकसित करण्यास परवानगी द्या : मुख्यमंत्री
केंद्र सरकारने विकसित केलेले कोविन हे अॅप सुरळीत चालत नसल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली आहे. याच कारणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारचे स्वत:चे अॅप विकसित करण्याची परवानगी मागितली आहे. या मुद्याकडे ठाकरे यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.