राजकारण

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास मोदी सरकार जबाबदार; २६ जून रोजी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसीची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. परंतु केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून शनिवार २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच सामाजिक न्याय दिनी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पटोले म्हणाले की, आरक्षण, संविधान आणि लोकशाही संपवण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश असून संघाच्या इशाऱ्यावर चालणारे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आरक्षण संपविण्यासाठीच काम करत आहे. देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली पण केंद्राने तो दिला नाही. केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. भाजपच्या या ओबीसीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शनिवार २६ जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोविड नियमांचे पालन करून आंदोलनात सहभागी होतील असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button