देशातील कोरोना स्थितीबाबत मोदी सरकार निष्काळजी : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तर कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पटोले यांनी म्हटलं, केंद्र सरकारने देशातील जनतेला मरायला सोडलं आहे असं चित्र पहायला मिळत आहे. लसीकरण हा या संकटात एक मोठा दुवा ठरू शकतो, अनेकांचा जीव वाचवू शकतो. केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली, सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून सुप्रीम कोर्टानेही देशाच्या जनतेला मरायला सोडलं आहे का? असा संतप्त सवाल केला. जागतिक पातळीवर अनेक देशांनी हा प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले पण आपल्या देशातील सरकारने काय केलं देशातील लस इतर देशांना पाठवली आपल्या विरोधात असलेल्या पाकिस्तानला सुद्धा पाठवली. देशातील अनेक शहर आणि गावे आज स्मशान झाल्याचं आपण पाहत आहोत.
बेजबाबदार पंतप्रधान
आतापर्यंत मोठे नुकसान झाले आहे. सध्यातरी लसीकरण हाच यावरील प्रभावी उपाय ठरत आहे. पण केंद्र सरकारने आपल्या देशातील लस दुसऱ्या देशांना पाठवली. ज्या पाकिस्तानला नेहमी शिव्या देता त्यांनाही ४.५ कोटी लसी दिल्या. एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
पटोले यांनी म्हटलं, काँग्रेसने वैद्यकीय सहायता पुरवणे यासोबतच रक्तदान शिबिरे आयोजित करुन मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे. लसीकरणाचा खर्च मोठा आहे त्याला हातभार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते आपल्या परिसरातील गरीब कुटुंबाना दत्तक घेऊन स्वत:च्या व त्या कुटुंबाच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.