स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आ. देवेंद्र भुयार यांना ३ महिने तुरुंगवासाची शिक्षा
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भुयार यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना २०१३ मध्ये शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम ३५३ अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं.
घटनेच्या दिवशी सुवर्ण जयंती राजस्व अभियान याची यशोगाथा तयार करत असताना देवेंद्र भुयार हे काही लोकांना घेऊन सभागृहात आले आणि तावातावाने बोलू लागले की, घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे व तुम्ही माझा फोन का काटला? असा प्रश्न विचारला. तसंच तत्कालीन तहसीलदार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर करण्यात आला होता.