मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?; भातखळकरांची टीका
मुंबई : सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. ते नागपुरातील अत्याधुनिक डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी बोलत होते. प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत निर्भया योजनेंतर्गत जलदगती डीएनए विश्लेषण विभाग आणि राज्यातील एकमेव अशा वन्यजीव डीएनए विश्लेषण विभागाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची उपस्थिती होती.
केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे अंमली पदार्थप्रकरणी होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे.’ तसेच, केंद्रातील तपास युनिटच या प्रकरणांचा तपास लावू शकतात, असे नाही. तर, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले होते पण त्यात ‘हिरोईन’चा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानावरुन भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 23, 2021
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, जेव्हा मंत्री पत्रकार परिषद घेऊन ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, तेव्हा मुख्यमंत्री मागे कसे राहतील? महाराष्ट्राला हेही दिवस पहायचे होते, अशी टीका करण्यात आली आहे.