फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बैठक; अधिवेशनाची रणनीती ठरणार
मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार आशिष शेलार, तसेच इतर काही बडे नेते या बैठकीला उपस्थित असतील. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची अनेक प्रश्नांवर कोंडी कऱण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात येऊ शकते.
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बुधवार २२ डिसेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना सदनात गोंधळ घातल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. यामुळे भाजपची बाजू विधानसभेत कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेत सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी रणनिती आखण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण, आगामी निवडणुका, आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांच्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सद्स्यांनी घातलेल्या गोंधळामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आमदारांच्या निलंबनाचे प्रकरणही न्यायालयीन आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून आमदारांना अद्याप दिलासा मिळाला नाही. होयकोर्टात जाण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशनात १२ आमदार उपस्थित नसतील याचा भाजपचा मोठा फटका बसणार आहे. या आमदारांच्या विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे.
राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपंचायत, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका विना ओबीसी होणार आहे. सर्व जागा या खुल्या प्रवर्गातून लढवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस मदान यांनी दिले आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही भाजपकडून महाविकास आघाडीची कोंडी करण्यासाठी चर्चा होऊ शकते. कोरोना काळातील कामांवरुन तसेच नुकसानभरपाई, विकासकामे आणि राज्यातील गुन्हेगारीवरुन भाजप सत्ताधाऱ्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.