चंद्रकांत पाटलांसाठी उमेदवारी नाकारलेल्या मेधा कुलकर्णी यांचे पुनर्वसन
भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारी नाकारलेल्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज होत्या. भाजप मेधा कुलकर्णी यांचं पुनर्वसन कसे करणार याची चर्चा होती. मात्र पक्षाने मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महिला मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांची सोमवारी (दि. २१) राष्ट्रीय महिला मोर्चाचे उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. या निमित्ताने त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कुलकर्णी यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली आहे.
मेधा कुलकर्णी यांचा २०१९ च्या विधानसभेला पत्ता कट करण्यात आला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिथून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी कुलकर्णी यांनी उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेतली नसली तरी त्यांची नाराजी देखील लपून राहिली नव्हती. त्यांना विधानपरिषदेला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र तिथेही पक्षाने त्यांच्या नावाचा विचार केला नाही.
पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्यांना पक्षाने २०१४ साली विधानसभेची उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपाच्या मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा ६५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. तसेच निवडून आल्यानंतर त्यांनी कोथरूडकरांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत ते मार्गी लावले होते. या आमदारकीच्या काळात त्यांनी आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला होता. २०१९ साली देखील कुलकर्णी यांना आपल्याला उमेदवारी मिळणार याची खात्री होती. मात्र पक्षाने चंद्रकांत पाटलांच्या रूपाने नवा उमेदवार कोथरूडकरांना दिला. आणि मेधा कुलकर्णी यांच्या नाराजी पर्वाला सुरुवात झाली.
डिसेंबर महिन्यात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी मेधा कुलकर्णी यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा नव्या दिशेने सुरु होण्याची संकेत मिळाले होते. तसेच त्यांना पक्षातर्फे महिला आघाडीत राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे पद मिळण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत होती.त्याच पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांची भाजपच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्तीने त्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.