मुंबई : भाजप नेत्यांची ही पोटदुखी आहे, मुंबईकरांना इतकं चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. आधी त्यांना वाटायचं हे होणारच नाही, पण आता ते शक्य झालंय म्हणून कुठे ना ना कुठे भांडणं लावायची आणि मुंबईकरांना गुमराह करायचं काम करण्याची सुपारी आशिष शेलारांनी घेतलेली आहे, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केलाय.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेनंतर भाजपा नेत्यांकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री यांना लक्ष्य केलं जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देर आए दुरुस्त आए… असे म्हणत टीका केली होती. त्यानंतर, अॅड. आशिष शेलार यांनीही टीका करत निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. शेलार यांच्या टीकेवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार पलटवार केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० चौरस फुटाच्या घरांचा कर माफ केलाय. त्यावरुन, हे भांडणं लावायचं काम करत आहेत. निश्चितच मुंबईकरांना जे चांगलं द्यायचं आहे, ते देण्यास आम्ही बांधिल आहोत, ती बांधिलकी आपण या एकेक गोष्टीतून पाळतोय हीच त्यांची बांधिलकी आहे. मग, कुठेच काही नाही म्हणून आगी लावत सुटायचं, काम भाजप नेत्यांकडून होत असल्याचा आरोपही पेडणेकर यांनी केला आहे.
सरकारला करमाफी करण्यास एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या मागणीला समर्थन किंबहुना भूमिका आम्हीच घेतली. पण शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषत: ५०० फुटांच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे बेगडी आहे. ते पुतणा मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांची प्राथमिकता काय आहे, ते स्पष्ट होते, असा टोला आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली. तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहीजे. मागील ४ वर्षांपासूनचे जे पैसे तुम्ही घेतले असतील तर ते मुंबईकरांना परत द्या, अशी आमची पहिली मागणी आहे. दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ५०० फुटापर्यंतचा शून्य कर हे धोरण मध्यवर्गीयांना सुद्धा लागू करा. ५०० फुटापर्यंतचा कर शून्य तर ५०० च्या वर असलेल्या करामध्ये १५० ते २०० रूपये कर असल्यास मुंबईकर भरण्यास तयार होतील. मध्यम वर्गीयांवर अन्याय करू नका, असे शेलार यांनी म्हटले आहे.