मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाही हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा मुलावरही बहुतेक विश्वास नसावा, अशी फिरकी चंद्रकांत पाटील यांनी घेतली. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते, असंही ते म्हणाले. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. अमृता फडणीवस लाईमलाईटमध्ये असतात त्यांना तुम्ही विरोधी पक्षनेत्या करणार का हे आधी सांगा. एकवेळ आदित्य ठाकरे हे मंत्री आहेत म्हणून त्यांचं नाव घेणं किंवा अन्य कोणाचं हे ठीक आहे. पण रश्मी ठाकरेंचं नाव का घेता. त्या कधीच यात नसतात. महाराष्ट्राचं राजकारण अजून किती खाली आणणार. महिलांचं हनन करणं ही हिंदू संस्कृती नाही, असं पेडणेकर म्हणाल्या.
उद्या रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य नाही : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील विधानभवनात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, राज्याचे पोलीस किती सक्षम आहेत ते दिसले. इतक्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा झाला असून, तो मंत्रालयापर्यंत येत आहे. एका मंत्र्याचे नाव अस्पष्टपणे यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी महाराष्ट्र पोलीस कसा तपास करू शकणार? त्यामुळे सीबीआय तपासाची मागणी केली आहे. लोकशाहीत आम्हाला काही मागण्याचा तरी अधिकार आहे की नाही? की आमचे तोंड दाबून ठेवणार आहात, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असे स्वाभाविक आहे. कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत, असा प्रश्न विचारला असता, त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. रश्मी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना मंत्री म्हणून सामील करून घ्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, स्वप्न तेव्हा पडते जेव्हा ते व्यवहारात येऊ शकत नसते. राष्ट्रपती राजवट येणे काही स्वप्न असून शकत नाही. राजवट येण्यासाठीची सर्व कारणे पूर्ण झाली आहेत. ती आणायची की नाही हा केंद्राचा विषय आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सामनातील टीकेला उत्तर देताना म्हटले.