राजकारण

मायावती उत्तर प्रदेश, उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार

एमआयएमशी आघाडी करण्याची शक्यता फेटाळली

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी बहुतांश पक्षांनी तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांबाबत बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मायावती यांनी जाहीर केला आहे. यावेळी बसप आणि एमआयएम यांच्या आघाडीबाबतच्या चर्चांना मायावती यांनी पूर्णविराम दिला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाशी बसप आघाडी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, बसप प्रमुख मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली असून, या चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले आहे.

प्रसारमाध्यमातील एका वृत्तवाहिनीकडून कालपासून अशी बातमी दाखवली जात आहे की, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक ओवेसींचा पक्ष एमआयएम व बसप एकत्र मिळून लढणार आहेत. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, भ्रामक आणि तथ्यहीन असून, यात काडीमात्रही सत्य नाही. बसपकडून याचे खंडन केले जात आहे. यासंदर्भात पक्षाकडून पुन्हा स्पष्ट केले जात आहे की, पंजाब सोडून उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणूक बसप कोणत्याही पक्षाशी आघाडी करून लढणार नाही. म्हणजेच, या निवडणुका स्वबळावरच लढवल्या जातील, असे ट्विट मायावती यांनी केले आहे.

पंजाबमध्ये अकाली दलाशी आघाडी

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांसह पंजाबमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर बसपने राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्र यांना बीएसपी सेलचे राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button