
उन्नाव : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याचा आपल्या पक्षाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. तसेच, भाजपची खिल्ली उडवत, त्यांनी चुकून आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर जैनच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड)मधून त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक भाजप नेत्यांची नावेही बाहेर येतील, असा दावाही अखिलेश यांनी केला आहे. ते समाजवादी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
अखिलेश म्हणाले, भाजपने चुकून आपल्याच उद्योगपतीवर छापा टाकला आहे. त्यांनी दावा केला, की समाजवादी अत्तर (परफ्यूम) पीयूष जैन नव्हे तर एमएलसी पुष्पराज जैन यांनी तयार केले होते. भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, सत्ताधारी भाजपने डिजिटल चुकीने आपल्याच व्यापाऱ्यावर (पीयूष जैन) छापा टाकला. यावेळी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने, नोटाबंदी आणि जीएसटी अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे, असेही अखिलेश म्हणाले.
गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर विभागाने आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये, कानपूरमधील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे २६७ कोटी रुपये रोख, २५ किलो सोने आणि २५० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पीयूष जैनला सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तत्पूर्वी, अत्तर व्यापारी पियुष जैनचा समाजवादी पक्षाशी संबंध होता, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. हरदोईच्या सभेत मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते, की काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापे टाकले तेव्हा अखिलेश यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती. राजकीय द्वेषापोटी छापे टाकले जात असल्याचे ते म्हणू लागले. मात्र, आज समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडे टाकलेल्या छाप्यात अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत, यामुळे त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले आहे.
हा पैसा समाजवादी पक्षाचाच असल्याचे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यापूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा जप्त केलेला पैसा म्हणजे, मागील सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची दुर्गंधी असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी कानपूरमधील सभेत म्हणाले, गेल्या दिवसांत पैशांनी भरलेले जे बॉक्स सापडले, हे लोक त्यातही म्हणतील, की हे भाजपनेच केले आहे. ‘मागच्या सरकारने भ्रष्टाचाराचे जे अत्तर शिंपडले होते, ते सर्वांच्या समोर आले आहे. पण आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत आणि याचे क्रेडीट घ्यायला तयार नाहीत. तसेच, नोटांचा पाहाड सर्वांनी पाहिला आहे, हेच यांचे (सपा) यश आहे, असा टोलाही मोदींना लगावला.
पकडला गेलेला पैसा समाजवादी पक्षाचा : अमित शाह
गृहमंत्री अमित शाह यांनीही हरदोई येथील जाहीर सभेत अखिलेश यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, आज त्यांना उत्तर देणे जमेना, कारण हा पैसा समाजवादी पक्षाच्याच अत्तर बनवणाऱ्याकडे सापडला आहे. एवढेच नाही, तर अखिलेश जी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही काळा पैसा संपवण्यासंदर्भात बोललो आहोत. आज रेड होत असल्याने त्यांना अस्वस्थ होत आहे. समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडून तब्बल अडीचशे कोटी रुपयांचे घबाड मिळाले आहे, असेही शाह म्हणाले.




