भारताच्या महिला ब्रिगेडची कमाल; एकमेव कसोटी अनिर्णित ठेवण्यात यश
लंडन : कारकीर्दीतला पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या अष्टपैलू स्नेह राणाने (नाबाद ८०) शानदार अर्धशतक झळकावत आणि तानिया भाटिया (नाबाद ४४) हिच्यासोबत नवव्या विकेटसाठी १०४ धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय भारतीय महिला संघाने हिसकावला. उभय देशांमध्ये खेळवण्यात आलेला एकमेव कसोटी सामना अनिर्णित करण्यात भारतीय महिला संघ यशस्वी ठरला.
इंग्लंडने पहिल्या डावात ९ फलंदाजांच्या बदल्यात ३९६ धावा करुन डाव घोषित केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणारा भारतीय महिलांचा संघ २३१ धावांमध्ये गारद झाला. त्यानंतर यजमान संघाने भारताला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. मात्र अंतिम क्रमांकावरील फलंदाजांनी डाव सारवला. नुसता डाव सावरला नाही तर पराभवातून संघाला बाहेर काढून हा सामना ड्रॉ केला. दुसऱ्या डावात भारतीय महिला संघाने ८ बाद ३४४ धावांपर्यत मजल मारली.
दरम्यान, आजच्या सामन्याद्वारे भारताकडून ५ महिला खेळाडूंनी पदार्पण केलं. त्यापैकी स्नेह, तानिया, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांनी पदार्पणाच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. स्नेह आणि तानिया हिने भारतीय महिला संघासाठी ९ व्या विकेटसाठीची आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी रचली. या दोघींनी नाबाद १०४ धावांची भागीदारी केली. हा विक्रम याआधी शुभांगी कुलकर्णी आणि मणिमाला सिंघल या जोडीच्या नावावर होता. या जोडीने १९८६ मध्ये इंग्लंडविरोधात ९ व्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली होती. स्नेह हिने तिच्या डावात १५४ चेंडूत १३ चौकार लगावले, तर तानियाने ६ चौकार वसूल केले.
टीम इंडियाने आज सकाळी १ बाद ८३ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. लंचपर्यंत महिला ब्रिगेडने ३ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या होत्या. यामध्ये दीप्ती शर्माच्या ५४ धावांच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. दीप्तीने पूनम राऊतसोबत ७२ धावांची भागीदारी केली. पण लंचआधी ती बाद झाली. लंचनंतर टीम इंडियाने ४ विकेट्स लवकर गमावल्या. या दरम्यान केवळ २८ धावाच जोडता आल्या. त्यावेळी भारताची अवस्था ७ बाद १९९ अशी होती. परंतु या सामन्याद्वारे पदार्पण करणाऱ्या शिखा पांडे (१८) आणि स्नेह राणाने ८ व्या विकेटसाठी ४१ धावांची निर्णायक भागीदारी केली. या भागीदारीने टीम इंडियाचं सामन्यातील आव्हान कायम ठेवलं. या जोडीने १७ षटकं फलंदाजी केली. त्यानंतर आलेल्या तानिया भाटिया हिच्या मदतीने स्नेहने किल्ला लढवला. स्नेह आणि तानिया अखेरपर्यंत नाबाद राहिल्या आणि सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरल्या.