कारमध्ये एकट्या व्यक्तीलाही मास्क बंधनकारक; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय
नवी दिल्ली: मास्क वापरण्याबाबत दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. तुम्ही घरी किंवा कारमध्ये एकटे असाल तरी मास्क लावणे बंधनकारक आहे. नाहीतर दंड आकारला जाईल, अशी तंबीच हायकोर्टाने दिली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्ली हायकोर्टानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे. कारमध्ये तुम्ही एकटे असला तरी मास्क लावावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढेच नव्हे तर कार सुद्धा सार्वजनिक ठिकाण असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. कारमध्ये एकटे असताना मास्क लावण्यात सांगण्यात येत असल्याबद्दल कोर्टात चार याचिका आल्या होत्या. त्या सर्व याचिका कोर्टाने फेटाळून लावत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
कारमध्ये जर आम्ही एकटे असू तर मास्क लावले नाही म्हणून दंड वसूल केला जाऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने सुनावणी करताना, कार भलेही कोणत्याही एका व्यक्तीची असेल मात्र ती एक सार्वजनिक जागाच आहे. मास्क सुरक्षा कवचासारखं आहे. त्याद्वारे कोरोना संसर्ग रोखता येतो. त्यामुळे तुम्ही घरी असा किंवा कारमध्ये मास्क लावलाच पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. जस्टिस प्रतिभा एम. सिंह यांनी हा निर्णय दिला आहे.