फोकस

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी ९ ऑगस्टला मशाल मोर्चा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. त्यासाठी ९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल आढावा बैठक घेण्यात आली.

विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यावे असे भूमिपुत्रांचे ठाम मत असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नाही. त्यामुळे कृती समितीने ऑगस्ट क्रांती दिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आहे. यासंदर्भात रूपरेषा, नियोजन आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आमदार महेश बालदी, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने यापूर्वी १० जून रोजी मोठे जनआंदोलन केले होते. तर २४ जून रोजी पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी लढा उभारण्यात आला. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांत जवळपास १५ ठिकाणी मानवी साखळी केली होती. १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button