पुणे: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येत्या मार्चमध्ये भाजपचं राज्यात सरकार स्थापन होणार असल्याचं भाकीत केलं आहे. राणेंच्या या विधानाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे. नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, अशा शब्दात भुजबळ यांनी राणेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.
भुजबळ आज पुण्यात होते. यावेळी पत्रकारांनी राणेंच्या भविष्यवाणीबाबत त्यांना विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, राज्य सरकारने दोन वर्षात चांगल काम केलं आहे. मी या कामावर समाधानी आहे. आता राणेंनी मार्चची डेडलाईन दिली आहे. पण त्यांचा मार्च कुठला ते शोधावं लागेल. पुढचा… त्याच्या पुढचा मार्चही जाईल… पाच वर्ष होतील… पण महाविकास आघाडी मजबूत राहील. महाविकास आघाडी पुढेही मजबूत राहील, असं भुजबळांनी सांगितलं.
भिडेवाड्यात शाळा सुरू करणार
, पुणे येथील राष्ट्रीय स्मारक असलेल्या फुलेवाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाबाबत आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते. यावेळी १९४८ साली भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात यावी. केवळ पुतळे न उभारता शाळा सुरू केल्यास खऱ्या अर्थाने ते स्मारक होईल. त्यानुसार येथे सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, अशी सूचना भुजबळांनी केली.
गाळेधारकांचं पुनर्वसन करणार
उपमुख्यमंत्री पवार यांनी या इमारतीत असलेले वाणिज्यिक गाळेधारक तसेच रहिवासी यांच्या पुनर्वसनाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्यात यावा. यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरणात सहमतीने तोडगा काढता येईल. या वाड्यात शाळेच्या रुपाने एक चांगले स्मारक उभे राहील यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्याबाबत सर्किट हाऊसमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. पुतळा बसवण्याच्या जागेची विद्यापीठ प्रशासनाबरोबर संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार मुख्य इमारतीसमोर पुतळा बसवणे उत्तम ठरणार आहे असे लक्षात आले आहे. कात्रज येथील परदेशी स्टुडिओमध्ये पुतळा बनवण्याचे काम सुरू असून आज त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. जयंतीदिनी हा पुतळा बसवण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.