मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी, शासन निर्णय आणि नंतर कोर्ट-कचेऱ्यांमुळे महाराष्ट्रातील मारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इच्छुक नसल्याचा आरोप करत सरकारचे आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवनेरी ते मुंबई अशा लाँग मार्चची घोषणा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. हा लाँग मार्च मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानांवर धडकणार आहे.
या लाँगमार्चबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी दिली आहे. राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे प्रस्थापित मराठा नेत्यांचं सरकार आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून सर्वसामान्य मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोप केरे यांनी केला आहे. तसेच हा लाँग मार्च हा मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवा यांच्या निवासस्थानावर धडकणार आहे, असा इशारा केरे यांनी दिला आहे. या लाँग मार्चचे नियोजन झाले असून, त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केरे यांनी दिली आहे.
मराठा समाजाचे मुक मोर्चे आणि दबावामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची घोषणा केली होती. या आरक्षणाला कोर्टात आव्हान दिले गेले होते. हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. मात्र सुप्रिम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली होती. तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाचा लढा सुरू आहे.