मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्रं मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्रं मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. मराठा समाजाला केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण देण्याची मागणी नरेंद्र मोदींकडे या पत्राद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्राने योग्य पावलं उचलावीत, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारने आणलेला अध्यादेश, नेमलेला गायकवाड आयोग, विधिमंडळात केलेला कायदा, सुप्रीम कोर्टात सरकारने दोन वेळा याबाबत केलेले प्रयत्न याची माहिती पंतप्रधानांना पत्रातून दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची समिती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन अहवाल १५ दिवसात देईल. अहवाल आल्यावर पुढे जाऊ, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.