नवी दिल्ली : भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही या देशातील लसी पंतप्रधान मोदींनी निर्यात केल्या आणि इथल्या लोकांना वाऱ्यावर सोडलं. आता पंतप्रधानांनी व्हॅक्सिन स्ट्रॅटेजी बनवून कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथी नव्हे तर कोरोनाच्या अनेक लाटा येतील असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. ते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषदेला संबोधित करत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, कोरोना हा सतत बदल होणारा विषाणू असल्याने याला जेवढा वेळ दिला जाईल किंवा स्पेस दिला जाईल तेवढा तो भयानक होईल. त्यावर एकच उपाय आहे आणि ते म्हणजे लवकरात लवकर सर्व लोकांचं लसीकरण करणे. लोकांना लस जर लवकर उपलब्ध करुन दिली नाही तर कोरोना लसीच्या पकडीतून निसटून जाईल, तो बदलेल. आताचा लसीकरणाचा वेग असाच राहिला तर सर्वांचं लसीकरण पूर्ण होण्यासाठी मे 2024 साल उजाडेल. तोपर्यंत कोरोनामध्ये बदल होईल आणि या लसीचा काहीच फायदा होणार नाही. मी याबद्दल फेब्रुवारीमध्येच सरकारला सतर्क केलं होतं पण सरकार आणि पंतप्रधानाना कोरोना समजलाच नाही.
भारत व्हॅक्सिन कॅपिटल असूनही, देशात कोरोना लसी तयार होत असूनही या देशातील नागरिकांना लस मिळत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या देशातील नागरिकांच्या लसी पंतप्रधानांनी व्हॅक्सिन डिप्लोमसीच्या नावाखाली इतर देशांना दिल्या असं राहुल गांधी म्हणाले. देशात आतापर्यंत केवळ तीन टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं असून 97 टक्के लोकांना पंतप्रधानांनी वाऱ्यावर सोडलंय असाही आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत, त्यांनी केवळ नौटंकी केली. त्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. सरकार खोटं पसरवतंय. सरकारनं लोकांना सत्य सांगावं कारण हा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे.